नगर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मितेश बाळासाहेब नाहाटा यांना साखर गैरव्यवहार प्रकरणात इंदौरच्या पोलिसांनी अटक केले आहे. त्यामुळे मितेश नाहाटाला पदावरून बडतर्फ करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी काढले आहे. मितेश बाळासाहेब नाहाटा हा श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे रहिवासी आहे.
पुणे येथील एक जणासमवेत मितेश नाहाटा याने इंदौरमधील व्यापाऱ्याला साखर देण्याच्या बदल्यात कोट्यावधीचा गंडा घातल्याची फिर्याद इंदौर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी तेथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मितेश नाहाटाला ताब्यात घेतले आहे. ही माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मितेश नाहाटाला पदावरून बडतर्फ केले आहे.
या प्रकरणातील फिर्यादीत सांगण्यात आलेला दुसरा आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील एका ज्येष्ठ दिवंगत नेत्याचा मुलगा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात मोठा राजकीय भूकंप झाल्याचे समजते. इंदौर पोलिसांच्या कारवाईच्या बातम्या सध्या श्रीगोंदा तालुक्यात सोशल मीडियावरून फिरत आहेत. बाळासाहेब नाहाटा हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्या मुलाला आर्थिक गैरव्यवहारात ताब्यात घेण्यात आल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी श्री. मितेश नाहाटा यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र संघटनात्मक दृष्टिकोनातून घेतलेली काही चुकीची पावले आणि त्यांच्या विरोधात प्राप्त झालेल्या फसवणुकीच्या तक्रारींमुळे त्यांना युवक प्रदेश उपाध्यक्ष पदावरून बडतर्फ केले जात आहे.यापुढे पक्षाच्या नावाचा वापर त्यांच्याकडून करण्यात येऊ नये, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी जाहीर केले आहे.
Post a Comment