छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राज्यात वातावरण तापवण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अनेक उमेदवारांवर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर देखील हल्ले करण्याच्या घटना राज्यभरात अनेक ठिकाणी घडल्याचे समोर आले आहे. यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप म्हस्के, भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना अडसड, अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला झाला. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, अनिल देशमुख सोमवारी रात्री 8 च्या सुमारास आपल्या मतदारसंघातील प्रचार संपवून घरी परतत होते. नरखेडहून परत येत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यात देशमुख यांच्या डोक्याला मार लागला. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून, आमचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर खबरदारी म्हणून संवेदनशील भागांतील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर हल्ला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर धामोरी-पिंपरखेड रोडवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी (१८ नोव्हेंबर) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. यात सोनवणेंसह दोन जण जखमी झाले. उपचारासाठी वाळूज येथील सीएमएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनवणे यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत.
भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहीणीवर हल्ला
अमरावती येथील धामणगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना रोठे (अडसड) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले सातेफळ फाट्यावर रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अर्चना रोठे गंभीर जखमी झाल्या आहेत. सोमवारी रात्री अर्चना रोठे प्रचार संपवून परतत असताना सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अर्चना रोठे यांची गाडी अडवत चारही बाजूने हल्ला केला.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप म्हस्के यांच्यावर हल्ला
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा पाटीजवळ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप म्हस्के यांच्या वाहनावर पाच जणांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी ता. १८ मध्यरात्री दिड वाजता घडली आहे. असून यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
Post a Comment