राहुरी मतदारसंघातील गावठी हातभट्टी‎ दारू अड्ड्यांवर छापेमारी



नगर - राज्य उत्पादनशुल्क राहुरी विभागाच्या दुय्यम निरीक्षकांनी राहुरी विधानसभा निवडणूक मतदारसंघात देवळाली प्रवरा येथील सात गावठी हातभट्टी केंद्रांवर कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासोबत ही संयुक्त कारवाई करण्यात आली. त्यात हातभट्टी गावठी दारूनिर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे घालून ते नष्ट करण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क राहुरी विभागाचे निरीक्षक चंद्रकांत सीताराम रासकर यांनी ही माहिती दिली. या कारवाईत एकूण ७ गुन्हे नोंद करण्यात आले असून, २ हजार ८९० लिटर रसायन व १३० लिटर हातभट्टी गावठी दारू नष्ट करण्यात आली. तसेच या गुन्ह्यात एक दुचाकी होंडा शाईन जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ९२ हजार ४५० रुपये इतकी आहे. 

या कारवाईत एकूण ७ आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय उपायुक्तांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एम. बी. साळवे, एस. बी. विधाटे, जवान एन. पी. बुरा, एस. जी. गुंजाळ, ए. ए. कांबळे, जे. आर. पठाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

0/Post a Comment/Comments