खा. निलेश लंके, अभिषेक कळमकर यांचे स्टेट्स ठेवल्याने तरुणाला बेदम मारहाण


नगर (प्रतिनिधी) - खा. निलेश लंके व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचे फोटो असलेले स्टेट्स मोबाईल मध्ये ठेवल्याने शहरातील एका तरुणाला तिघांनी बेदम मारहाण करत पोलिस ठाण्यात तक्रार केली तर अॅट्रॉसिटी चा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (दि.२०) दुपारी घडली.

ओंकार शेळके (रा. काटवन खंडोबा) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेळके हा कोतवाली पोलिस स्टेशनच्या मागील बाजूच्या गल्लीत मेडिकल दुकानात कामाला असून तो काम करत असताना तेथे दुपारी ५ जण आले. त्यातील तिघांनी त्याला 'तू खा. निलेश लंके, अभिषेक कळमकर यांचे स्टेट्स का ठेवतो, संग्राम भैय्यांचे का नाही' असे म्हणत त्यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जाताना तू जर आमची पोलिसांकडे तक्रार केली तर तुझ्यावर अॅट्रॉसिटी चा खोटा गुन्हा दाखल करू, तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली असल्याचे जखमी ओंकार शेळके याने सांगितले.

मारहाणीत जखमी शेळके यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यावर अभिषेक कळमकर, युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, दिलीप सातपुते यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत शेळके याच्या प्रकृतीची विचारपूस केली. मारहाण करणारे सर्वजण आ.संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते होते असा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments