नगर तालुक्यातील अंगणवाडी सेविकेचा खुन करून मृतदेह नदीत फेकला



नगर - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या शिवारातील मारुतीची वाडी या वस्तीवरील बेपत्ता झालेल्या अंगणवाडी सेविका उमा महेश पवार (वय ३२, रा. चिचोंडी पाटील, ता.नगर) यांचा मृतदेह तेथून जवळच असलेल्या मेहेकरी नदीच्या पात्रात २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० च्या सुारास आढळून आला आहे. त्यांचा खुन करून मृतदेह नदीत फेकणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुभाष बंडू बर्डे (वय २५, रा.कुक्कडवेढे, ता.राहुरी हल्ली रा.चिचोंडी पाटील, ता.नगर) असे आरोपीचे नाव आहे.

मयत उमा पवार या चिचोंडी पाटील गावच्या शिवारात भातोडी रस्त्यावर मारुतीची वाडी येथे असलेल्या मिनी अंगणवाडीत कार्यरत होत्या. त्या गुरूवारी (दि.२४) सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेल्या मात्र, दुपारी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, त्या कोठेही आढळून आल्या नाहीत. त्यानंतर नातेवाईक व काही ग्रामस्थांनी थेट अंगणवाडीत जावून पाहणी केली असता अंगणवाडीला बाहेरून कुलूप लावले असल्याचे दिसून आले. नातेवाईक व ग्रामस्थांनी अंगणवाडीचे कुलूप तोडले असता अंगणवाडीच्या फरशीवर सर्वत्र सक्ताचा सडा पडलेला होता. तेथे डोक्याचे केस व अंतर्वस्त्र देखील आढळून आले.

फरशीवरून ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी परिसरात पाहणी केली असता घटनास्थळापासून काही अंतरावर काहीतरी ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या. काही अंतरावर परत काही कपडे आढळून आले असल्याने पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले होते. श्वानांनी तेथून जवळच असलेल्या मेहेकरी नदी पर्यंत माग दाखवला होता. रात्री उशिरापर्यंत परिसरात उमा पवार अथवा त्यांचा मृतदेह आढळलेला नव्हता.

पोलिसांनी रात्रभर राबविली शोध मोहीम 

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह पोलिस पथकांकडून रात्रभर शोध कार्य सुरू होते. पोलिसांची काही पथके संशयितांचाही शोध घेत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. 

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली 

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे चिचोंडी पाटील गावातीलच आरोपी सुभाष बर्डे याला ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला मयत पवार यांनी त्याच्या मुलीच्या पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडीत बोलावले होते. त्यावेळी तिला एकटीला पाहून त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यास पवार यांनी प्रतिकार केला असता झटापटीत आरोपीने त्यांचे डोके भिंतीवर आपटवले. त्यामुळे त्या बेशुद्ध पडून जागीच मयत झाल्या. 

त्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचा मृतदेह ओढत नेवून मेहेकरी नदीच्या पाण्यात टाकल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी सकाळपासून त्याने ज्या ठिकाणी मृतदेह टाकला, त्या ठिकाणापासून खाली मृतदेहाचा शोध सुरु केला. त्यानंतर तेथून काही अंतरावर सकाळी ८.३० च्या सुारास उमा पवार यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. मयत अंगणवाडी सेविका उमा पवार यांच्या पश्चात पती, २ लहान मुले, सासू असा परिवार आहे.

अशाच महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी आमचा 8282835002 हा नंबर आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा  

0/Post a Comment/Comments