नगरच्या कांदा मार्केटमधील व्यापार्‍यांवर जीवघेणा हल्ला करुन लुटले


अहमदनगर - नगरच्या नेप्ती कांदा मार्केट मधील आडत व्यापारी सय्यद बंधूंवर बायपास रोडवर अज्ञात हल्लेखोरांनी तलवार, कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. तसेच त्यांच्या जवळील सुमारे ५० लाखांपेक्षा जास्त रोकड पळवून नेल्याची घटना शनिवारी (दि.) सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे.

नेप्ती कांदा मार्केट मधील समीर ट्रेडींग कंपनीचे समिर सय्यद व सोहेब सय्यद यांच्यावर हा हल्ला झाला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सय्यद बंधू हे सकाळी ११ च्या सुमारास कार मधून नगरकडून नेप्ती कांदा मार्केट कडे जात होते. केडगाव बायपास चौकातून बायपास रस्त्याने ते नेप्ती कांदा मार्केट कडे वळाले. 

चौकाच्या काही अंतर पुढे आल्यावर एका वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. त्यांची कार थांबताच अन्य वाहनातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारच्या काचा फोडत दोघा बंधूंवर तलवार, कोयत्याने वार केले. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या कार मध्ये ठेवलेली पैशांची बॅग घेवून तेथून पोबारा केला. या बॅगमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी आणलेली ५० लाखांपेक्षा जास्त रोकड होती.

या हल्ल्याची माहिती मिळताच नेप्ती कांदा मार्केट मधील व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघा सय्यद बंधूंना उपचारासाठी नगरच्या खाजगी रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती, कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सह पोलिस पथकाने घटनास्थळी तसेच दवाखान्यात भेट देत माहिती घेतली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले,.संग्राम जगताप यांच्यासह बाजार समितीच्या संचालक मंडळाने रुग्णालयात जावून जखमी व्यापाऱ्यांची विचारपूस केली. 

बाजार समितीचे संचालक मंडळ, आडते व्यापारी, हमाल मापाडी यांनी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती यांची भेट घेत त्यांना याबाबत निवेदन दिले.  सदर हल्ल्याची लवकरात लवकर चौकशी करुन हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यांत यावी, अन्यथा अहमदनगर बाजार समितीचे संचालक मंडळ तसेच शेतकरी, आडते, व्यापारी, हमाल, मापाडी व सर्व संबंधित घटक हे कोणत्याही क्षणी रस्‍त्यावर उतरुन रस्ता रोको आंदोलन करतील. असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments