नगर - सक्कर चौकातील यश पॅलेस हॉटेलच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करुन तू यश पॅलेस येथे काम करु नकोस, तू येथून कोठेही जा, अशी दमदाटी केल्याची व तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याची घटना सोमवारी (दि.१)मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सचिन कोतकर यांच्यासह ७ जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राकेशकुमार रामनारायण सिंग (वय ४५, रा. नंदकिशोर रेसिडेन्सी, वडगाव गुप्ता रोड, नागापूर) यांनी फिर्याद दिली आहे. सिंग हे २०२० पर्यंत उदयनराजे पॅलेस येथे व्यवस्थापक म्हणून नोकरी करत होतो. सन २०२१ मध्ये ते यश पॅलेस येथे नोकरीस लागले. तेव्हापासून ते तेथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी (दि.१) मध्यरात्री उदयनराजे पॅलेस येथील प्रिन्स कुमार सिंग याने फोन केला व शिवीगाळ केली.
त्यानंतर घरी जात असतांना सचिन कोतकर यांच्या सांगण्यावरून रोशनकुमार मिश्रा उर्फ राजन कुमार, प्रिन्स कुमार सिंग, निरज कुमार, अमन श्रीकांत सिंग, सुनिल कुमार सिंग, हनुमान रामदास झरेकर यांनी दमदाटी करत तुला नगरमध्ये राहू देणार नाही, तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी ७ जणांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५१ (२) (३), ३५२, १८९ (२), १९०, १९१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
Post a Comment