नगर तालुक्यात १०९ पैकी बहुतांश गावांत डॉ.सुजय विखेंना 'लीड'



अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके व त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात जोरदार लढत झाली. या लढतीत विधानसभेच्या ३ मतदार संघात विभागलेल्या नगर तालुक्यातील १०९ गावांपैकी बहुतांशी गावांमध्ये विजयी उमेदवार निलेश लंके यांचे मताधिक्य रोखण्यात माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांची यंत्रणा यशस्वी झाली आहे. नगर तालुक्यातील गावांमधून डॉ.सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले असल्याचे गावनिहाय मतांच्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्डिले हे महाविकास आघाडीला सरस ठरले आहेत. 

निलेश लंके यांनी २८ हजार ९२९ मताधिक्य मिळवून विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली असून, डॉ. सुजय विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मते मिळाली आहेत. विधानसभा मतदार संघांचा विचार करता लंके यांना पारनेर, श्रीगोंदा, कर्जत जामखेड या ठिकाणी निर्णायक आघाडी मिळाली. तर विखे यांना नगर शहर, राहुरी व शेवगाव पाथर्डीने साथ दिली. या ६ पैकी पारनेर, श्रीगोंदा व राहुरी या ३ मतदार संघात समाविष्ट असलेल्या बहुतांश गावांत माजी मंत्री कर्डिले यांच्या यंत्रणेचा प्रभाव दिसून आला. तर महाआघाडी येथे मागे पडल्याचे स्पष्ट झाले.

भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते, कर्जत जामखेडचे आमदार प्रा. राम शिंदे लंके यांचा वारु थोपवू शकले नाही. परंतु, नगर तालुक्यात भाजपाचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले हे निलेश लंके यांचा वारु थोपविण्यात यशस्वी झाले आहेत. नगर तालुक्यात विखे-लंके यांच्यात काँटे की टक्कर झाल्याचे पहावयास मिळाले. मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरुन नगर तालुक्यात विखे लीडवर असल्याचे दिसून येत आहे.

प्रमुख गावांमध्ये कोणाला मिळाले लीड?

लोकसभा निवडणुकीमध्ये नगर तालुक्यातील बहुतांश गावांत विखे-लंके यांच्यात मोठी चुरस पहावयास मिळाली. तालुक्यातील बुर्‍हाणनगर, जेऊर, शेडी, पोखर्डी, पिंपळगाव माळवी, दरेवाडी, वडारवाडी, बाराबाभळी, पांगरमल, सोकेवाडी, निंबळक, घोसपुरी, सारोळा कासार, अकोळनेर, खंडाळा, चास, नवनागापूर, वडगाव गुप्ता या गावांत सुजय विखे पाटील यांना मताधिक्य मिळाले तर पिंपळगाव उजैनी, इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी, उदरमल, वाकोडी, चिचोंडी पाटील, अरणगाव, खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, देवळगाव सिद्धी, वाळकी, बाबुर्डी घुमट, भोरवाडी, अस्तगाव, सोनेवाडी, देहरे, पिंपळगाव वाघा, नांदगाव, विळद, खारे कर्जुने, इसळक, वडगाव गुप्ता, नेप्ती, रुईछत्तीशी, गुंडेगाव या गावांमध्ये खा. निलेश लंके यांना मताधिक्य मिळाले.

विधानसभेपेक्षा लोकसभेत लंके यांचे मताधिक्य घटले

गत विधानसभा निवडणुकीमध्ये नगर तालुक्यातील परंतु पारनेर विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या गावांमध्ये निलेश लंके यांना सुमारे २३ हजारांच्या पुढे मताधिक्य मिळाले होते. विधानभेला लंके यांच्या विजयात नगर तालुक्यातील गांवाचा मोलाचा वाटा होता. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पारनेर मतदारसंघात असलेल्या नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमधील गावांमधून विखे यांच्यापेक्षा लंके यांना अवघे साडेचार हजारांचे लीड मिळाले असल्याचे निकालाच्या आकड्यातून समोर आले आहे. याच गावांनी विधानसभेला २३ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिले होते. त्यामुळे लंके यांचे नगर तालुक्यातील मताधिक्य घटले आहे.

नगर तालुक्यातील गावांमध्ये मिळालेली मते 

राहुरी विधानसभा मतदार संघात नगर तालुक्यातील एकूण २५ गावे आहेत. त्या २५ गावांमध्ये डॉ.सुजय विखे यांना एकूण २५ हजार ८४४ मते मिळाली. तर निलेश लंके यांना १८ हजार ७२९ मते मिळाली आहेत. या २५ गावांमध्ये विखे यांना ७ हजार ११५ मतांचे लीड मिळाले आहे. 

पारनेर विधानसभा मतदार संघात नगर तालुक्यातील एकूण ३९ गावे आहेत. त्या ३९ गावांमध्ये डॉ.सुजय विखे यांना एकूण ३० हजार ६५४ मते मिळाली. तर निलेश लंके यांना ३५ हजार ३८ मते मिळाली आहेत. या ३९ गावांमध्ये लंके  यांना ४ हजार ३८४ मतांचे लीड मिळाले आहे. 

श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात नगर तालुक्यातील एकूण ४५ गावे आहेत. त्या ४५ गावांमध्ये डॉ.सुजय विखे यांना एकूण २२ हजार ८५३ मते मिळाली. तर निलेश लंके यांना २४ हजार ८८६ मते मिळाली आहेत. या ४५ गावांमध्ये लंके  यांना २ हजार ३३ मतांचे लीड मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण नगर तालुक्यातील १०९ गावांमधून डॉ. सुजय विखे यांना ६९८ मतांचे लीड मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 

0/Post a Comment/Comments