विखेंच्या साम्राज्याला हादरा देणाऱ्या निलेश लंकेंचे मताधिक्य का घटले?



नगर - १८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून यात नगर जिल्ह्यातील महायुतीच्या दोनही विद्यमान खासदारांचा पराभव झाला. महाआघाडीच्या उमेदवारांनी दोन्ही जागा जिंकत इतिहास रचला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेचे विद्यमान खा. सदाशिव लोखंडे यांचा ५० हजार ५२९ मतांनी तर नगर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी भाजपचे खा.डॉ. सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांच्या फरकाने पराभव केला. 

या निवडणुकीत लंके यांनी भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणार्‍या गडाला खिंडार पाडले. त्यांच्या विजयात पारनेर तालुक्यातील मताधिक्क्याचा मोलाचा वाटा असून वाकचौरे यांच्या विजयात अकोले, संगमनेर विधानसभा क्षेत्रातील मताधिक्याने निर्णायक भुमिका बजावली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यात महायुतीला धक्का दिला. शिर्डी आणि नगर या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. पक्षफुटीमळे मशाल या चिन्हासह निवडणुकीला सामोरे गेलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार वाकैचारे यांची मशाल चांगलीच पेटली तर नगर दक्षिणमध्ये लंके यांची तुतारी जोरात वाजली. निकालानंतर विजयी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करत गुलालाची उधळण करत जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकलेला होता.

शिर्डीचा निकाल आधी जाहीर झाला. हायहोल्टेज ठरलेल्या नगर लोकसभा मतदारसंघाचा निकाला हाती येण्यास उशीर झाला. मतमोजणी प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत संथगतीने सुरू होती. दरम्यान सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान विजयाची खात्री होताच निलेश लंके मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. त्याठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांसह मोजणीच्या प्रक्रियेत सहभागी कार्यकर्ते, पोलींग एजंट यांच्याशी संवाद साधला. यावेळी काही काळ लंके भावनिक झाल्याचे दिसून होते. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत मतेमोजणी कक्षात ठाण मांडून होते.

पिपानी मुळे निलेश लंकेंचे मताधिक्य घटले?

लोकसभेच्या या निवडणुकीत निलेश लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली तर सुजय विखे यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मते मिळाली. लंके हे २८ हजार ९२९ मतांनी विजयी झाले आहेत. मात्र या निवडणुकीत आश्चर्याची बाब म्हणजे अपक्ष उमेदवार गोरक्ष आळेकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत. आळेकर यांना तब्बल ४४ हजार ५९७ मते मिळाली. आळेकर यांचे चिन्ह पिपानी होते आणि ते लंके यांच्या तुतारी या चिन्हासारखे होते. तसेच नगर दक्षिण मध्ये २ बॅलेट युनिट होते. 

पहिल्या युनिट वर लंके यांचा अनुक्रम नंबर २ तर दुसऱ्या युनिट वर आळेकर यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळेच आळेकर यांना एवढी मते मिळाली असल्याची चर्चा आता होवू लागली आहे. आळेकर यांना अजून मते मिळाली असती तर कदाचित त्याचा मोठा फटका लंके यांना बसला असता असेही बोलले जात आहे.हा सर्व यंत्रणेचा खेळ होता अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. 


 


0/Post a Comment/Comments